स्वागत २०२६: एक नवी पहाट: नवीन वर्ष, नवीन दिवस, नवीन सूर्योदय, नवनवीन संकल्प आणि नवा उत्साह…
सालाबादप्रमाणे कॅलेंडर बदलण्याची वेळ समीप आली आहे. नवीन वर्षाच्या आगमनाची चाहूल लागली असून, महिना आणि वर्ष बदलून आता २०२६ सालाची सुरुवात होईल. ‘२०२५’ नावाचा एक मैलाचा दगड मागे पडेल आणि क्षितिजावर २०२६ दिसू लागेल. प्रत्येक बारा महिन्यांनी घडणारा हा स्वाभाविक बदल, अविरत चालणाऱ्या कालचक्राचाच एक भाग आहे. हा बदल प्रत्येकाच्या आयुष्यात एका वर्षाची भर घालणारा असतो.
काळाच्या ओघात ऋतू बदलतील, आयुष्याचे रंग बदलतील आणि जीवनाचे प्राधान्यक्रमही बदलतील. अगदी आर्थिक आणि सामाजिक स्थानही बदलेल. कोरोनानंतरच्या काळात आता वातावरण आणि हवामान बदलाचे पडसाद प्रकर्षाने उमटताना दिसत आहेत.
नवीन वर्ष, नवीन दिवस, नवीन सूर्योदय, नवनवीन संकल्प आणि नवा उत्साह… हा ‘मनुष्य’ असण्याचा एक सुंदर अनुभव आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या प्रक्रियेतून नदी-नाले, पर्वत, झाड-झुडपे असे चराचर सृष्टीचे सर्व घटक निसर्गतः जातच असतात. या जगात कधीतरी अस्तित्वात येणे, काही काळ टिकणे, वाढणे आणि काळाच्या ओघात एके दिवशी लुप्त होणे हे कोणालाही चुकलेले नाही. या आयुष्याचे मोजमाप कधी ५० वर्षांचे असते, तर कधी १००. सजीव असो वा निर्जीव, सर्वांनाच या चक्रातून जावे लागते.
या निसर्गचक्राची जाणीव असणारे ‘मनुष्य’ म्हणून माझे अस्तित्व निश्चितच वेगळे आहे. आपण राहत असलेल्या समाजाचा सहवास, जगण्याचा आनंद आणि सांस्कृतिक अनुभूती मानवी जीवन समृद्ध करत असते. मानवाव्यतिरिक्त इतर सर्व सजीवांचे आयुष्य एका ठराविक चाकोरीत चालते. गाय गायच राहते आणि वडाचे झाड वडाचेच राहते. मात्र, केवळ मानवाला जन्म आणि मृत्यूच्या दरम्यानच्या काळात एका विशिष्ट चाकोरीबाहेर जाऊन नृत्य, कला, संगीत, लेखन आणि सामाजिक भान जपण्याची ताकद मिळाली आहे. स्वतःच्या पलीकडे जाऊन या विश्वाचा आणि विश्वाला चालवणाऱ्या उर्जेचा विचार करण्याची जाणीव निसर्गाने केवळ मानवाला दिली आहे.

परंतु, या मर्यादांच्या बाहेर जाताना समाजाच्या चौकटींना धक्का लागणार नाही आणि स्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचारात होणार नाही, याची काळजी आपण घेतली पाहिजे. नैसर्गिक साधनसंपत्ती आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जाता आले पाहिजे. माझ्या स्वातंत्र्याचा समाजस्वास्थ्यावर आणि निसर्गाच्या साखळीवर विपरीत परिणाम होत नाही ना, याचे भान ठेवणे आवश्यक आहे.

बघा ना, मर्यादा ओलांडली की वाहत्या पाण्याचा ‘पूर’ होतो, हळुवार वाऱ्याचे ‘वादळ’ होते आणि सुखद लाटांची ‘सुनामी’ होते. अशा वेळी सृजन आणि आनंदाची अनुभूती ताणतणावात, तर विकासाचे रूपांतर विनाशात होऊ शकते.
त्यामुळे उत्सव जरूर करा, आनंद निर्माण करा, संगीत आणि नृत्याच्या मोहक अनुभूतीचे साक्षीदार व्हा. परिवार आणि मित्रमंडळींसोबत गप्पांची मैफिल रंगवा. आनंद मनापासून अनुभवा आणि तो इतरांसोबत वाटा. सर्व ताणतणाव झुगारून देऊन मुक्त मनाने नवीन वर्षाला सामोरे जा. मागील वर्षातील अप्रिय प्रसंग विसरून आणि नात्यांमधील कटू आठवणींचे कायमस्वरूपी विसर्जन करून, स्वच्छ व प्रसन्न मनाने नवीन वर्षाचे स्वागत करा.
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना येणारे २०२६ वर्ष सुख-समृद्धी, आरोग्य आणि आनंदाचे जावो, हीच मनःपूर्वक प्रार्थना!
– डॉ. पराग काळकर, प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

















