पुणे: कन्नड संघ संचलित कावेरी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दोन दिवसीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा पुरस्कार व मूळ ऑलिंपिक पदकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर व व्सयवस्थापन परीषद सदस्य प्रसेनजीत फडणवीस, सिनेट सदस्य कृष्णा भंडलकर, कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष कुशल हेगडे, प्राचार्या डॉ. मुक्ता करमरकर, उपप्राचार्य डॉ. आनंद बुद्धिकोट यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या विशेष प्रदर्शनात भारताच्या गौरवशाली क्रीडा वारशाचे दर्शन घडविणारे दुर्मिळ व ऐतिहासिक पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये ऑलिंपिक वीर बाबू निमल यांचे १९३६ सालचे बर्लिन ऑलिंपिक पदक, खाशाबा जाधव यांचे १९५६ सालचे हेलसिंग ऑलिंपिक ब्रॉन्झ पदक तसेच १९४८ मधील सहाव्या क्रमांकाचे पदक, तसेच २०२४ पॅरिस पॅरा ऑलिंपिकमध्ये सचिन खिलारे यांनी मिळवलेले रौप्यपदक यांचा समावेश आहे.
याशिवाय पोलीस अधिकारी आणि कुस्तीपटू राहुल आवारे यांची मूळ पदके — कॉमनवेल्थ, वर्ल्ड व एशियन कुस्ती चॅम्पियनशिप यांसह शिवछत्रपती पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद पुरस्कार, तेनसिंग नॉर्वे पुरस्कार इत्यादी प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार प्रदर्शित करण्यात आले आहेत. तसेच पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या ४० वर्षांच्या प्रवासाचे विशेष दर्शन घडविण्यात आले आहे.
डॉ. पराग काळकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “अशा प्रकारचे प्रदर्शन विद्यार्थ्यांमध्ये विविध क्रीडा प्रकारांविषयी कुतूहल आणि आवड निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरते.”
प्रदर्शनाच्या निमित्ताने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू — श्रीमती गुरुबंस कौर, श्रीमती शकुंतला खटावकर व श्रीमती स्मिता यादव — यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्राचार्या डॉ. मुक्ता करमरकर व उपप्राचार्य डॉ. आनंद बुद्धिकोट यांचे मार्गदर्शन लाभले असून क्रीडा विभागप्रमुख डॉ. रोहित तांबे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रदर्शन दि. २८ व २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायं ५ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.















Leave a Reply