सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गॅस तुटवड्यामुळे मेस-कॅन्टीन बंद होण्याच्या मार्गावर
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे गॅसच्या तुटवड्यामुळे विद्यापीठ परिसरातील मेस आणि कॅन्टीन बंद पडण्याच्या मार्गावर असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गॅस टंचाईमुळे मेसचालक आणि गाळेचालकांना खानावळी चालवणे कठीण होत असून याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जेवणाच्या व्यवस्थेवर होत आहे.
विद्यापीठात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी अनेक विद्यार्थी परिसरातील मेस आणि कॅन्टीनवर अवलंबून आहेत. मात्र गॅसची उपलब्धता कमी झाल्याने काही ठिकाणी भोजन तयार करणे अवघड झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि अभ्यासाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या जेवणाची नियमित व्यवस्था होणे अत्यंत आवश्यक असल्याने प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.सध्या विद्यार्थ्यांच्या अन्न व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत असल्याने विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
“विद्यापीठात गॅस टंचाईमुळे मेसचालक आणि गाळेचालक खानावळी बंद करण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि अभ्यासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यापीठाने तातडीने पर्यायी व्यवस्था करून विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न मार्गी लावावा.”
– शिवा बारोळे , विद्यार्थी प्रतिनिधी
“विद्यापीठातील मेस आणि कॅन्टीन गॅसच्या तुटवड्यामुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी भोजनगृह गुणवत्ता व नियंत्रण समितीने तातडीने या विषयाकडे लक्ष देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा.”
गणेश शिंदे,भोजनगृह गुणवत्ता व नियंत्रण समितीचे सदस्य

















Leave a Reply