सेट पेपरफुटी प्रकरणावर भाजप युवा मोर्चाची विद्यापीठ प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी; भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांची मागणी 

पुणे :राज्यातील SET परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाने उलगडत चाललेल्या धक्कादायक घडामोडींमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ, संभ्रम आणि अविश्वास निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा, पुणे शहर च्यावतीने अध्यक्ष दुष्यंत अनिल मोहोळ यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देत तात्काळ कठोर व पारदर्शक कार्यवाहीची मागणी केली आहे.

मोहोळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २५ नोव्हेंबर रोजी राज्यातील अग्रगण्य दैनिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार आरोपींनी प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन तब्बल २५ ते ३० विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवल्याची कबुली दिली आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काही व्यक्तींना अटक करण्यात आली असून तपासाची व्याप्ती वाढवून प्रकरण पोलीस उपअधीक्षकांकडे सोपविण्यात आले आहे.

परीक्षेच्या दिवशीच पेपर देण्यासंबंधी चर्चा करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी उचललेले प्रश्नदेखील अजूनही अनुत्तरित राहिले आहेत. त्या वेळी सेट विभागाने उडवा-उडवीची भूमिका घेतल्याने विद्यार्थ्यांचा संताप वाढला होता, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या संदर्भात भाजप युवा मोर्चाने पुढील मागण्या केल्या आहेत :

  • सेट विभागातील समन्वयक, अधिकारी आणि प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या तज्ज्ञ प्राध्यापकांची स्वायत्त, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करावी.
  • चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाई करावी.
  • भविष्यात अशाप्रकारचे प्रकार टाळण्यासाठी SET परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेचे टेक्निकल ऑडिट, सुरक्षा पुनरावलोकन आणि नवी पारदर्शक प्रक्रिया राबवावी.
  • विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी विद्यापीठाने स्पष्ट, तातडीचे आणि विश्वास देणारे अधिकृत निवेदन जारी करावे.
  • विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही घटकांविरुद्ध शून्य-सहिष्णुतेची भूमिका घ्यावी.

मोहोळ यांनी नमूद केले की, राज्यस्तरीय SET सारखी परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. अशा परीक्षेत झालेली पेपरफुटी ही विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, प्रामाणिकपणाचा आणि भावी संधींचा गंभीर अनादर आहे. त्यामुळे विद्यापीठाने तात्काळ ठोस आणि पारदर्शक पावले उचलावीत, अशी अपेक्षा मोहोळ यांनी व्यक्त केली.

See also  श्रावण पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमा:आपलं रक्षाबंधन - डॉ. पराग काळकर

यावेळी निवेदनाची प्रत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही पाठविण्यात आली असून, विद्यापीठ प्रशासनाकडे विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी निर्णायक पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे

SET सारख्या राज्यस्तरीय परीक्षेतील पेपरफुटी ही विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि भविष्याचा अपमान आहे. विद्यापीठाने तात्काळ कठोर व पारदर्शक पावले उचलणे अत्यावश्यक आहे.”

दुष्यंत मोहोळ, जिल्हाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, पुणे जिल्हा 

“प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या ते समन्वयकांपर्यंत सर्व संबंधितांची स्वायत्त चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, तेव्हाच विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल.”

— शिवा बारोळे, विद्यार्थी प्रतिनिधी