श्रीकृष्ण जन्माष्टमी एक विचारमंथन: दहीहंडी म्हणजे विविधतेतुन एकतेचा संदेश – डॉ. पराग काळकर
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा आपण भारतभर वेगवेगळ्या प्रथा-परंपरांनी साजरा करतो. या निमित्ताने बालगोपाळ एकत्र जमतात आणि “सहना ववतु सहनौ भुनक्तु” याप्रमाणे आपापले अन्न प्रसाद म्हणून एकत्र करून “काला” वाटून घेतात. प्रत्येकाच्या घरातील प्रसाद आणि लोणी एकत्र करून पुन्हा सर्वांना वाटून घेण्याची ही संस्कृती “वसुधैव कुटुंबकम्” किंवा “हे विश्वची माझे घर” या विचारांची प्रचिती देते.
खरं तर, ही दहीहंडी केवळ दही, दूध, किंवा लोण्याची नसून ती आपल्या कर्माचे फळ (नवनीत) एकत्र येऊन वाटून घेण्याचा संदेश देते. म्हणजेच, विविधतेतून एकतेचा हा संदेश आहे. ही दहीहंडी चांगल्या विचारांची, कार्याची, पुस्तकांची किंवा वस्तूंनी भरलेली असावी. याचा अर्थ, आपल्याकडे जे काही सर्वोत्तम आहे ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं आणि “मी” पेक्षा “आम्ही” चा विचार करणं गरजेचं आहे.

या समाजमंथनातून आणि दहीहंडीच्या मानवी मनोऱ्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती समाजाच्या खालच्या स्तरावरून यशाच्या शिखरावर पोहोचते, तेव्हा तिच्यापर्यंत सुख, संपत्ती आणि सुविधा सहज पोहोचतात. पण या यशामागे समाजातील प्रत्येक स्तराचा आणि घटकाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असतो. “माझ्या यशामागे फक्त मी आणि माझे कुटुंब नाही, तर माझा समाज आणि देश आहे” ही भावना मनात रुजायला हवी.
या सांघिक भावनेतून, समाजातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांची जाणीव झाल्यास आपल्यातील अहंकाराची हंडी फुटेल. त्यामुळे आपलं यश, संपत्ती आणि विद्वत्ता सर्वांसोबत वाटून घेतल्याने अधिक आनंद मिळेल. आपल्याला यशस्वी होण्यासाठी समाजातील असंख्य घटकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वाटा आहे, याची जाणीव ठेवून जर आपण वागलो, तर आपण श्रीकृष्णाच्या अधिक जवळ जाऊ. जन्माष्टमीच्या हार्दिक सर्वांना शुभेच्छा!
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत.)



















Leave a Reply