कावेरी महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न
पुणे : कावेरी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण सोहळा दि. १९ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे Savitribai Phule Pune University च्या नियामक मंडळाचे सदस्य श्री. रवींद्र शिंगणापूरकर होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्री. शिंगणापूरकर यांनी “खेळाडू हा राष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक असतो” असे सांगत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीयत्वाची जाणीव जपावी, असा संदेश दिला. “केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे” या उक्तीद्वारे त्यांनी कृतीशीलतेचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी सिनेट सदस्य श्री. कृष्णा भंडलकर यांच्या हस्तेही विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला कन्नड संघ, पुणेच्या सचिव मा. मालती कलमाडी, प्राचार्या डॉ. मुक्ता करमरकर, उपप्राचार्य डॉ. आनंद बुद्धिकोट तसेच शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रोहित तांबे उपस्थित होते.
प्राचार्या डॉ. मुक्ता करमरकर यांनी स्वागतपर भाषणात विद्यार्थ्यांनी उत्कृष्टतेचा ध्यास ठेवावा, असे सांगत ‘जिंकणे महत्त्वाचे असले तरी सहभाग आणि खेळाडूवृत्ती तितकीच महत्त्वाची आहे’ असे मत व्यक्त केले. श्री. कृष्णा भंडलकर यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ध्येयाकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात मा. मालती कलमाडी यांनी खेळाडूंनी नियमित सरावावर भर द्यावा असे सांगत महाविद्यालयाच्या क्रीडा उपक्रमांचे कौतुक केले. तसेच २५ मार्च २०२६ रोजी श्री. सुरेश कलमाडी यांच्या स्मरणार्थ क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाची घोषणा करण्यात आली.
या प्रसंगी ‘एलाईट स्पोर्ट्स पर्सन स्कॉलरशिप’ अंतर्गत प्रणव गाडगीळ व श्रेया शेलार (रु. १५,०००/-) तसेच सुजल लखारी (रु. १०,०००/-) यांना गौरविण्यात आले. भुवन पवार, श्रीम प्रसाद व अर्जुन पाटणकर यांना स्व. दत्तात्रय श्रीराम मोरे विशेष शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. श्रावणी खवळे हिला स्व. सुनीता करमरकर पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय, राज्य, आंतरविद्यापीठ, इंटर झोनल व झोनल स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम, पारितोषिके व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. तसेच माजी विद्यार्थिनी लेफ्टनंट सई सुकाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास आजी-माजी विद्यार्थी, पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. पूजा आंबोळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रोहित तांबे यांनी मानले.



