डॉ. प्रफुल्ल पवार यांच्याकडे पुन्हा कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार
पुणे |Savitribai Phule Pune University (एसपीपीयू) मध्ये कुलसचिव पदाबाबत गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुन्हा एकदा अनुभवी नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते माजी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्याकडे आज दि. १० एप्रिल रोजी पुन्हा कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
मागील दोन ते तीन वर्षांत या महत्त्वाच्या पदावर विविध अधिकाऱ्यांनी प्रभारी कुलसचिव म्हणून जबाबदारी सांभाळली. या प्रक्रियेमुळे प्रशासनाला विविध अनुभव मिळाले असून कार्यपद्धती अधिक सक्षम करण्याची संधी निर्माण झाली आहे.
डॉ. प्रफुल्ल पवार यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कायमस्वरूपी कुलसचिव नियुक्तीचा निर्णय प्रलंबित असला तरी, योग्य आणि सक्षम उमेदवाराची निवड करण्यासाठी प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. यामुळे भविष्यात अधिक स्थिर आणि प्रभावी प्रशासन उभे राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कायमस्वरूपी नियुक्तीच्या प्रक्रियेदरम्यान विविध पर्यायांचा विचार करण्यात आला. नौरोजी वाडीया महाविद्यालय येथील प्राध्यापकांच्या नावाचाही विचार झाला होता, ज्यामुळे या पदासाठी सक्षम पर्याय उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले परंतु हा पर्याय न्यायालयात प्रविष्ट असल्याने यावर अद्याप तोडगा निघाला नाही.
डॉ. पवार यांना पुन्हा अतिरिक्त कार्यभार देण्याचा निर्णय हा प्रशासनातील सातत्य राखण्यासाठी आणि दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यापीठाच्या निर्णय प्रक्रियेला आणि समन्वयाला होणार असल्याची अपेक्षा आहे.
विद्यापीठातील विद्यार्थ्यी संघटना, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्गानेही या निर्णयाचे स्वागत केले असून विद्यार्थी संघटना तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांतर्फे डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.



