सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर गोंधळ; विद्यार्थी संघटनांनी केली चिंता व्यक्त
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट उघडल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगळ्याच भाषेचा मजकूर दिसत असल्याची निदर्शनास येते आहे. काही दिवसांपूर्वी देखील यासारखा प्रकार घडला होता, पण आता पुन्हा एकदा वेबसाईट संदर्भातील गोंधळ समोर आला आहे. विद्यार्थ्यांचे मत आहे की, विद्यापीठाच्या वेबसाईटवर अशी समस्या उद्भवल्याने वैयक्तिक आणि गोपनीय माहिती सुरक्षित आहे की नाही याबाबत शंका निर्माण होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाल्याचे विद्यार्थी प्रतिनिधींनी नमूद केले.
“विद्यापीठ प्रशासनाने तातडीने या समस्येवर जाहीर प्रकटन करून आपली भूमिका स्पष्ट करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होणार नाही.”
राहुल ससाणे, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती
गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठ विविध कारणांसाठी सतत चर्चेत आहे. वेबसाईटवरील समस्या लवकरात लवकर दुरुस्त करणे ही प्रशासनाची प्राथमिकता असावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यापीठ प्रशासनाने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
वेबसाईट कोणत्याही संस्थेचा आरसा असतो. ती फक्त माहिती प्रकाशित करण्याचे साधन नाही, तर संस्थेची प्रतिमा, विश्वास आणि शैक्षणिक प्रतिष्ठाही दर्शवते. त्यामुळे वेबसाईटची सुरक्षितता आणि व्यवस्थित देखभाल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
संस्थेचा संपूर्ण महत्वाचा डेटा वेबसाईटवर उपलब्ध असतो. विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, अभ्यासक्रमाची माहिती, निकाल, संशोधन डेटा असे सर्व काही यामध्ये समाविष्ट असते. त्यामुळे या माहितीचे संरक्षण करणे हे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे.
वेबसाईटवर गोंधळ निर्माण झाल्यास संपूर्ण संस्थेचा डेटा आणि गोपनीय माहिती धोक्यात येऊ शकते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि शंका निर्माण होतात, ज्यामुळे संस्थेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो.















Leave a Reply