विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडवणार – दुष्यंत मोहोळ; भाजयुमो तर्फे विद्यापीठात विद्यार्थी संवादाचे आयोजन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या संवादात भाजप युवा मोर्चा पुणे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ आणि शिवा बारोळे प्रमुख उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या शैक्षणिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. विद्यापीठ पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी कुलगुरू, प्र-कुलगुरू व कुलसचिव यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, तर शासन स्तरावरील प्रश्न संबंधित अधिकारी, मंत्री व शिक्षण मंत्री यांच्याकडे सादर करून तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही मोहोळ यांनी विद्यार्थ्यांना दिली.
या कार्यक्रमाला विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य कृष्णा भंडलकर, भाजप युवा मोर्चा खडकी अध्यक्ष योगेश कानूरकर यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संवादाचे आयोजन शिवा बारोळे यांनी केले होते.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणार – दुष्यंत मोहोळ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध अडचणी मांडल्या. कँटिनमधील अन्नाची गुणवत्ता, वसतिगृहातील सुविधा, परीक्षा शुल्कातील वाढ, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध सोयी-सुविधा या प्रमुख समस्यांचा यात समावेश होता. यावर प्रतिक्रिया देताना भाजप युवा मोर्चा पुणे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ म्हणाले, “विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. कँटिनमधील अन्नाच्या दर्जाबाबत विद्यापीठ प्रशासनाशी बोलून सुधारणा घडवून आणू. परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांच्या परवडीनुसार ठेवण्यासाठी पाठपुरावा करू. वसतिगृहातील सोयींवर देखरेख वाढवून विद्यार्थी सुरक्षित आणि समाधानी राहतील, याची काळजी घेऊ. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उभारल्या जातील.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे केवळ चर्चेपुरते पाहणार नाही, तर ठोस तोडगा निघेपर्यंत पाठपुरावा करू. विद्यापीठ पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी कुलगुरू, प्रकुलगुरू आणि कुलसचिव यांच्याशी सातत्याने संवाद साधू तसेच शासन पातळीवरील समस्या थेट संबंधित अधिकारी व शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचवून मार्ग काढू.”
– दुष्यंत मोहोळ, शहराध्यक्ष, पुणे, भाजप युवा मोर्चा
विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडण्यासाठी हा संवाद म्हणजे एक व्यासपीठ आहे विद्यार्थ्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी अशा संवादांची परंपरा कायम ठेवू.”
– शिवा बारोळे, भाजप युवा मोर्चा















Leave a Reply