नवरात्र: नवशक्तीचा जागर; नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांचा, नवतेजाचा, नवतत्त्वाचा आणि नवचैतन्याचा जागर
नवरात्री सुरू होत आहे, नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांचा, नवतेजाचा, नवतत्त्वाचा आणि नवचैतन्याचा जागर होणार आहे. माझ्या आयुष्यात हे सृजनात्मक चैतन्य माझ्या जन्मापूर्वीपासूनच आहे आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मला त्या प्रकृतीची अनुभूती होत असते.
देवीची ही नऊ रूपे अशी आहेत:
१. शैलपुत्री
२. ब्रह्मचारिणी
३. चंद्रघंटा
४. कूष्मांडा
५. स्कंदमाता
६. कात्यायनी
७. कालरात्री
८. महागौरी
९. सिद्धिदात्री
माझ्या सभोवतालच्या वातावरणात आणि विचारांमध्ये निर्माण होणाऱ्या नकारात्मक सूक्ष्मलहरी आणि विचार या आदिशक्तीच्या स्वरूपात नष्ट होतात.
प्रत्येक देह म्हणजे एक घट असतो, ज्याच्या आतील आणि बाहेरील चैतन्य एकच असते. मातीतून घट आकार घेतो आणि शेवटी मातीतच विलीन होतो. या जीवनातील प्रखर सत्याची जाणीव मला या निमित्ताने व्हावी. नश्वर देह हे कर्म करण्याचे साधन आहे, जीवनाचे साध्य नाही, कारण या मातीतून जन्म घेऊन पुन्हा त्यातच विलीन व्हायचे असते याची मला खात्री पटते. पंचमहाभूतांनी बनलेला हा देह पुन्हा पंचतत्त्वांमध्येच विलीन होणार आहे.

ज्योतीच्या रूपाने मला त्या चैतन्याचे आत्मस्वरूप दिसते आणि त्यातून निर्माण होणारी ऊर्जा माझ्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा जाळून टाकते.
स्त्रीशक्ती आई, बहीण, मैत्रीण, सखी आणि सहचरी अशा अनेक रूपांत माझ्या जीवनात उपस्थित असते. ती माझ्या प्रत्येक भावनेचा आदर करते आणि जीवनाच्या सर्व टप्प्यांवर, दृश्य-अदृश्य रूपात माझ्या पाठीशी उभी राहते. खरं तर, तिच्या त्या रूपामुळेच मला माया, ममता, वात्सल्य, प्रेम, काळजी आणि प्रेरणा यांसारख्या सर्व हळुवार आणि तरल भावनांचा अर्थ कळतो आणि त्याची जाणीव होते.

आपले सर्वस्व अर्पण करून एखाद्याच्या आयुष्यात विलीन होऊन जाणे, जसे दुधात साखर विरघळते, किंवा एखाद्या घराचे घरपण होऊन जाणे, हे फक्त स्त्रीतत्त्वालाच जमते.
या नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या जीवनात नवचैतन्य येवो आणि आपले आयुष्य सुख व स्वानंदाने भरून जावो. ही नवी ऊर्जा आपल्याला जीवनातील ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा आणि बळ देवो.
(लेखक डॉ. पराग काळकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत.)


















Leave a Reply