स्थापना दिनानिमित्त अभाविप चे विद्यापीठ प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. विद्यापीठ कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पुणे :अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शाखेने ९ जुलै रोजी त्यांच्या स्थापना दिनानिमित्त आणि राष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त कुलसचिव ज्योती भाकरे यांना विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत निवेदन सादर केले. विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या लक्षात घेऊन परिषदेने विद्यापीठ प्रशासनासमोर खालील महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. या सर्व मागण्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित आहेत आणि त्यांची लवकरात लवकर तपासणी करून कारवाई करावी. असे या निवेदनात नमूद केले आहे.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांमध्ये गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निवेदन दिले आहे. विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर या मागण्यांकडे लक्ष द्यावे आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत.
शिवा बरोले, प्रतिनिधी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे की वसतिगृहाची स्वच्छता, खुले अभ्यासिका, दळणवळण सुविधा, साइनबोर्ड, स्वच्छ पाणी आणि सुरक्षित पार्किंग – या सर्व आवश्यकता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. या मागण्या केवळ सोयीसाठी नाहीत तर दर्जेदार शैक्षणिक वातावरणासाठी देखील आवश्यक आहेत.
– तनिष्क शेळके, अभाविप, अध्यक्ष, पुणे विद्यापीठ
अभाविप च्या प्रमुख मागण्या
- वसतिगृहाची स्वच्छता आणि कीटकांपासून संरक्षणासाठी उपाय केला पाहिजे.
- मराठा एम्पायर स्टडी सेंटर इतर विभागांच्या विद्यार्थ्यांसाठी खुले करावे.
- प्रत्येक विभागाचे संपर्क क्रमांक अद्ययावत करावेत आणि सक्रिय संपर्क क्रमांक द्यावेत.
- नवीन विभागांसाठी किंवा काम सुरू असलेल्या विभागांसाठी दिशादर्शक फलक लावावेत.
- स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी व्यायामशाळेत वॉटर कूलर बसवावे.
- विद्यार्थ्यांच्या पार्किंगसाठी शेडची व्यवस्था तात्काळ करावी.













Leave a Reply