फार्मा-केमिकल क्षेत्रात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संधी : बार्टीत कौशल्यविकास प्रकल्प यशस्वी

पुणे – अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी फार्मा आणि केमिकल इंडस्ट्रीमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने “Skill Development Program for B.Sc./M.Sc. Chemistry Students in association with BARTI” हा नवीनीपूर्ण पायलट प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आला. महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली व Sygenflo Laboratories LLP च्या सहकार्याने राबविलेल्या या प्रकल्पात 40 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्रा. हरी पवार (आबासाहेब गरवारे कॉलेज) व प्रकल्प प्रमुख ओंकार कांची यांच्या मेहनतीने या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये स्टुडंट हेल्पिंग हँड्स संस्थेचे विशेष सहकार्य लाभले. या प्रशिक्षणाचा ठोस परिणाम दिसून आला असून, एकूण 40 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 22 विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. यामध्ये अनाथ, एकल पालक कुटुंबातील आणि पिढीतले पहिले पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या जिद्दी व चिकाटीचे कौतुक करताना महासंचालक सुनील वारे यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले.

पुणे हे उच्च शिक्षणाचे प्रमुख केंद्र असल्याने येथे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी स्थलांतर करतात. त्यापैकी B.Sc. व M.Sc. Chemistry शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या साधारण 5,000 ते 6,000 इतकी आहे. हे विद्यार्थी प्रामुख्याने फार्मास्युटिकल आणि केमिकल इंडस्ट्रीत नोकरी करण्याची इच्छा बाळगतात. मात्र महाविद्यालयीन स्तरावर प्लेसमेंटच्या संधी अत्यल्प असल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यात मोठे अडथळे येतात.

हीच पार्श्वभूमी लक्षात घेऊन बार्टीतर्फे हा प्रकल्प हाती घेण्यात आला. आता या प्रकल्पाचा विस्तार करून 1,000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यासाठी ₹2 कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली असून, लवकरच या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

नवीन शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत कौशल्यविकास प्रशिक्षणांना प्राधान्य दिले जात असल्याने, बार्टीकडून या कोर्सला कायमस्वरूपी मान्यता मिळाल्यास मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी फार्मा व केमिकल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

See also  लोहगावला पाण्याच्या टाक्यांचा मार्ग मोकळा; वनमंत्री नाईक यांचा तातडीने जागा हस्तांतरित करण्याचा आदेश

Related posts: