सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना यूजीसीचा कडक इशारा: कॉलेज सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची फी परत करणे अनिवार्य
पुणे |विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर कॉलेज सोडल्यास त्यांची फी परत देणे शिक्षण संस्थांसाठी अनिवार्य आहे, असे स्पष्ट निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना दिले आहेत. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्यात येईल तसेच त्यांना कोणतीही सरकारी अनुदाने दिली जाणार नाहीत, असा इशाराही आयोगाने दिला आहे.
यूजीसीने या संदर्भात सर्व राज्य सरकारांना आणि विद्यापीठ प्रशासनांना पत्र पाठवून सांगितले आहे की, वारंवार सूचना करूनही अनेक उच्च शिक्षण संस्था विद्यार्थ्यांची फी परत करत नाहीत तसेच त्यांचे मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रही परत देत नाहीत. अशा संस्थांवर आता कठोर कारवाई करण्यात येईल.
पत्रात नमूद करण्यात आले आहे की, ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश रद्द करण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेने संपूर्ण फी परत द्यावी, असे यूजीसीच्या नियमांनुसार बंधनकारक आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर मान्यता रद्द करणे, दंड लावणे, पुढील एक किंवा अधिक सत्रांसाठी प्रवेशबंदी घालणे तसेच राज्य कायद्यांनुसार कारवाई करणे अशी पावले उचलली जातील.
यूजीसीने सर्व राज्य सरकारांना विनंती केली आहे की, त्यांच्या अधीन असलेल्या सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये फी परताव्याचे नियम काटेकोरपणे लागू केले जावेत आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे वेळेवर निराकरण व्हावे याची दक्षता घ्यावी.














Leave a Reply