मनविसेचे आक्रमक आंदोलन : COEP गर्ल्स हॉस्टेल रेक्टरला झुरळांचे ताट भेट देऊन ७२ तासांत असुविधा दूर करा, अन्यथा प्रशासनाला असुविधा निर्माण करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे काॅलेज प्रशासनाला देण्यात आला.
पुणे |पुण्यातील नामांकित व महाराष्ट्रातील अग्रेसर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (COEP) महाविद्यालयामध्ये दिनांक ७ नोव्हेंबर रोजी मुलींच्या वसतिगृहातील गंभीर असुविधा आणि मेस मधील घाणेरड्या परिस्थिती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने तर्फे (मनविसे) आक्रमक आंदोलन करण्यात आले. यावेळी मनविसे कार्यकर्त्यांनी हॉस्टेल रेक्टरला झुरळांनी भरलेले ताट सादर करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी सीओईपी गर्ल्स हॉस्टेलच्या मेसमध्ये जेवणात झुरळे, माश्या, अगदी स्टेपलर पिन सापडल्याच्या घटनांनी विद्यार्थिनींमध्ये संताप निर्माण झाला होता. वारंवार तक्रारी करूनही मेस व्यवस्थापन व वॉर्डन यांनी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणांनी काॅलेज परिसर दणाणून सोडला त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या आंदोलनात सचिन पवार, रुपेश घोलप, अभिषेक थिटे, सारंग सराफ, परिक्षीत शिरोळे, विक्रांत भिलारे, आशुतोष माने, संतोष वरे, अशोक पवार, निलेश जोरी, हेमंत बोळगे, सागर कुलकर्णी, श्रीराज धुमाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मेसमधील अस्वच्छता, दुर्गंधी आणि वाईट दर्जाचे अन्न याबरोबरच हॉस्टेलमध्ये पाण्याची टंचाई, वीजपुरवठ्याची कमतरता, वायफायचा अभाव, लिफ्ट बंद पडणे, कॉमन एरियामधील दिवे न लागणे, तुटलेल्या दारे-खिडक्या, बाथरूममधील अस्वच्छता अशा अनेक समस्या विद्यार्थिनींनी मांडल्या आहेत. या संदर्भात कालेज प्रशासनाने त्वरित कारवाई करून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडाव्यात.
– धनंजय दळवी, शहराध्यक्ष, मनविसे, पुणे शहर
मनविसेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी आणि विभागाध्यक्ष केतन डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विद्यार्थिनींच्या तक्रारी त्वरित दूर करण्याची मागणी करण्यात आली. हॉस्टेल प्रशासनाला ७२ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, जर सर्व सुविधा — मेसमधील स्वच्छ अन्न, २४x७ पाणी-वीज, स्थिर वायफाय, स्वच्छता आणि इतर आवश्यक दुरुस्त्या — पुरवल्या नाहीत तर मनविसे कॉलेज प्रशासनाला “असुविधा निर्माण” करेल असा इशारा देण्यात आला.

मनविसेने विविध मागण्या
- मेस व्यवस्थापक, केटरर्स आणि वॉर्डन यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी.
- कायमस्वरूपी वसतिगृह व्यवस्थापक नेमावा
- २४x७ तक्रार निवारण यंत्रणा निर्माण करावी.














Leave a Reply