विद्यार्थ्यांची वाढली चिंता : महाज्योतीतर्फे आता स्पर्धा परीक्षेचे ऑनलाइन प्रशिक्षण, विद्यावेतन होणार बंद
पुणे: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) तर्फे अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण आणि मासिक विद्यावेतन दिले जात होते. मात्र यंदापासून संस्थेने प्रशिक्षण ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला असून विद्यावेतन योजना बंद केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुविधा मिळण्याऐवजी आर्थिक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ही योजना महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय (ओबीसी), विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. पात्र विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि संबंधित आरक्षण प्रवर्गातील असावा, अशी अट आहे.
ऑनलाइन प्रशिक्षण, विद्यावेतन बंद, टॅबलेट व ६ जीबी डेटाचा दावा
महाज्योती योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना जेईई, नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे हा आहे. याअंतर्गत प्रशिक्षणासोबत विद्यावेतनही मिळत होते. परंतु आता केवळ ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की त्यांना सर्वाधिक गरज आहे ती आर्थिक मदतीची, ज्यामुळे ते रोजच्या गरजा भागवत स्वअध्ययनातून प्रगती करू शकतील. ऑनलाइन प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना टॅबलेट आणि दररोज ६ जीबी डेटा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी आपल्या मूळ ठिकाणी राहूनही अभ्यास करू शकतील. पण विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की इंटरनेट व टॅबलेटपेक्षा महाज्योतीने विद्यावेतन सुरू ठेवले तरच आर्थिक अडचणी कमी होतील.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक गरज आहे ती आर्थिक मदतीची. टॅबलेट आणि इंटरनेट उपयोगी आहेत, पण त्याने पोट भरत नाही. विद्यावेतनच आमच्यासाठी खरी ताकद आहे. ऑनलाइन प्रशिक्षणाने अभ्यासाची गती वाढेल, पण आर्थिक पाठबळ नसेल तर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी ही संधी गमावतील.”– शिवा बारोळे, अभाविप, पुणे
विद्यार्थ्यांचा अभ्यास सोपा व्हावा म्हणून तंत्रज्ञान उपयुक्त आहे, पण प्रशिक्षणासोबत विद्यावेतन कायम ठेवले तरच ही योजना खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल. महाज्योती योजनेतून अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. ऑनलाइन प्रशिक्षणाबरोबरच आर्थिक मदत चालू ठेवणे ही काळाची गरज आहे.”–सोमनाथ लोहार, अध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी, पश्चिम महाराष्ट्र
विद्यावेतन बंद करणे हा दुर्दैवी निर्णय आहे. प्रशिक्षण आणि विद्यावेतन – दोन्ही मिळाले, तरच स्पर्धा परीक्षेत वंचित वर्ग पुढे जाऊ शकेल. विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचे आहे, पण घरचा खर्च भागवणे कठीण असते. विद्यावेतन हेच त्याच्या शिक्षणाचे खरे आधारस्तंभ होते; त्याशिवाय भविष्य अधांतरी लटकून राहील.
-राहुल ससाणे, अध्यक्ष विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती



