लाडक्या बाप्पाला निरोप देतांना… पुढच्या वर्षी लवकर या – डॉ. पराग काळकर
दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीच्या जल्लोषपूर्ण वातावरणात होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव आणि विविध सोसायट्यांमधून सर्वजण आपापल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात मग्न आहेत. दहा दिवसांच्या उत्साहाच्या वातावरणामुळे सर्व घरे आनंदी झाली. उत्सवाचे स्वरूप बदलत आहे. स्वतःच्या कला दाखवण्याचं आणि त्या माध्यमातून नवनवीन कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याचं ते एक माध्यम आहे.
माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक दिवस पुन्हा कधीच येणार नाही. त्यामुळे आजचा दिवस आणि आजचा क्षण आनंदात जगण्याचा संदेश हा उत्सव आपल्याला देतो. माणूस जन्माला येताना काहीच घेऊन येत नाही, आणि या भूतलावर तो काहीच नवीन निर्माण करत नाही. पंचमहाभूतांचे मिश्रण आणि त्यातला बदल हीच माणसाची सृजनता आहे. उपलब्ध साधनांचा योग्य वापर करूनही, या जगाचा निरोप घेताना तो काहीच घेऊन जात नाही. आपण जपलेला देहसुद्धा इथेच अग्नीला अर्पण करून जावं लागतं.
माणसाच्या अहंकाराचा आणि ‘मी’पणाचा लोप होणे आणि माझ्याइतकाच या भूतलावरील सर्व सजीवांचा जगण्याचा हक्क जपला पाहिजे, हे यातून शिकायला मिळते. शाडूच्या मातीतून साकारलेलं गणेश रूप वाजतगाजत आणलं, त्याची पूजा केली, गोडधोड बनवलं, आणि पुन्हा दहा दिवसांनी त्याचं विसर्जन केलं. पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली सगुण साकार प्रतिमा पुन्हा त्याच तत्वांमध्ये विसर्जित/विलीन झाली आहे. आपल्या सणांमधून जीवनाचं हे मर्म समजलं, तर जीवन नक्कीच आनंदी आणि समाधानी होण्यास मदत होईल. नेहमीप्रमाणे यावर्षीही आम्ही बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले. हीच सकारात्मक ऊर्जा आपण सातत्याने जपली पाहिजे.
(लेखक डॉ पराग काळकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत.)


















Leave a Reply