सालाबादप्रमाणे आपण पारंपरिक सण आणि क्षण साजरे करत असतो. प्रत्येक सणाचे आमच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यात काहीतरी महत्त्व आहे. काळाच्या ओघात सण-समारंभ बाह्य रूपात व्यक्त होताना त्यामधील मर्म आमच्यापर्यंत पोहोचायचे राहून जाते… आमचा आनंद आणि उत्साह बाह्य अनुकरणात कुठेतरी अडकला आहे आणि कशाच्या (वस्तू) अथवा कोणाच्या (व्यक्ती) अधीन झाला आहे. प्रत्येक ऋतू बदलताना निसर्गामध्ये होणारा सुंदर उत्सव आम्ही रूपकात्मक रीतीने आमच्या सणांमध्ये बसवला आहे. शांत, निवांत तेवणारी समई अथवा दिव्याची आश्वासक ऊब आणि अशा असंख्य दीपांच्या सुंदर प्रकाशाचा उत्सव मनाच्या गाभाऱ्यात छानशी आभा प्रज्वलित करून जातो.
या निमित्ताने जसा निसर्ग पानगळीच्या रूपाने जुन्या अनावश्यक गोष्टी विसर्जित करतो, तसेच आम्हीही आमच्या मनातली मतमतांतरांची, कटू आठवणींची, एकमेकांमधील रुसवे-फुगवे यांची जीर्ण अडगळ पूर्णतः फेकून, सोडून दिली पाहिजे. नकारात्मक विचारांचे तण कारण नसताना ताणतणाव निर्माण करतात. नरकचतुर्दशी हाच संदेश शरीरावरील मळ काढून, सुगंधित तेलाच्या मालिशने रक्ताभिसरण सुधारण्याने देत असतो.

माझ्या घरात असलेली लक्ष्मी, पैसा-अडका, दागदागिने लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सदर लक्ष्मीचे आगमन मुख्य दारानेच वाजत-गाजत व्हायला हवे, याची जाणीव करून देते. या निमित्ताने आपल्या कुटुंबातील सर्व नात्यांचेही ‘सर्व्हिसिंग’ पाडवा, भाऊबीज अशा क्षणांनी होत असते. प्रकाशाची लयलूट असणाऱ्या या सर्वसमावेशक, आरोग्यदायी उत्सवाने आपले मन, घर आणि परिवार अधिक समाधानी व्हावा, ही मनःपूर्वक प्रार्थना


















Leave a Reply