श्रावणमासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहीकडे.
क्षणात येते सर सर शिरवे,
क्षणात फिरुनी ऊन पडे…
बालकवींनी या गीतातून वर्णन केलेला श्रावण हा मनामनांत चैतन्य पेरणारा पाचूसारखा हिरवागार महिना आहे. भारतीय वर्षगणनेतील या पाचव्या महिन्याच्या पौर्णिमेच्या सुमारास श्रवण नक्षत्र असते; म्हणूनच या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.
श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे
मुक्त प्रदर्शन…..
श्रावण म्हणजे एक अद्भुत
निसर्गदत्त देणगी…..
श्रावण म्हणजे हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन! हिरव्या रंगांची विशाल वस्त्रे एकावर एक लपेटून उभे असलेले चराचर डोळ्यांचे पारणे फेडते. श्रावणातील संध्याकाळी, मावळत्या सूर्याला निरोप देणारे ढग विविध रंगांनी नटूनथटून पश्चिमेच्या क्षितिजापाशी गोळा होतात. सूर्यबिंबाला त्यावेळी सौम्य, शांत अशी वेगळीच रुपेरी झळाळी प्राप्त झालेली असते.
या सृष्टिसौंदर्याच्या मोहातूनच कविवर्य मंगेश पाडगावकरांनी श्रावणाचे यथार्थ वर्णन केले आहे.
“श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीमधारा, उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा”
मनामनात उत्साह, आनंद भरून टाकणारा! रोजच्या रूटीनमय जगण्याचा सोहळा करणारा! डोंगरवाटांमधून भटकंतीची साद घालणारा! हसवणारा, नाचवणारा श्रावण… तुम्हीही अनुभवली असतील अशी श्रावणाची विविध रूपं. श्रावण मास म्हणजे एक अद्भुत निसर्गदत्त देणगी! श्रावणात निसर्गाचे रूप चैतन्याचे लेणं लेवून दिवसागणिक विलोभनीय बनते. एकामागून एक येणारी पारंपरिक सणांची मालिकाच हा श्रावण मास घेऊन येतो. चैतन्यमयी वातावरण निर्मितीचा राजा असलेला श्रावण प्रत्येकाच्या मनामनात आनंदाची भरभरून पेरणी करतो.
कविवर्य कुसुमाग्रज यांच्याच शब्दांत सांगायचे तर,
“हासरा नाचरा जरासा लाजरा,
सुंदर साजिरा श्रावण आला.”
(लेखक प्रा. डॉ. पराग काळकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत)








