व्यवसाहीक, मेडीकल, इंजिनिअरिंगच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा
शेवटच्या फेरीत प्रवेश घेतल्यावरही शिष्यवृत्ती, शुल्क प्रतिपूर्ती मिळणार
पुणे: राज्यातील मेडीकल आणि इंजिनिअरिंग अभ्यासक्रम निवडणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. शेवटच्या फेरीत (Last Round) किंवा संस्थास्तरावर (Institute Level) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू राहणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत काय होत होते?
खासगी विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संस्थास्तरावरील फेरीत प्रवेश घेतल्यास शिष्यवृत्ती आणि शुल्क प्रतिपूर्तीपासून वंचित राहावे लागत होते.
शासनाचा सुधारित निर्णय काय म्हणतो?
राज्य शासनाने अखेर हा अन्यायकारक अट बदलली असून,
केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतील (CAP) शेवटच्या फेरीत प्रवेश घेणाऱ्या, तसेच
CAP पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरीय प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांवरही निर्णयाचा लाभ
राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग, तसेच कृषी विभागांतर्गत असलेल्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी CAP च्या विविध फेऱ्यांद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.
CAP प्रक्रिया संपल्यानंतर महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांसाठी संस्थास्तरावर प्रवेश दिला जातो, पण हा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाकारली जात होती.
लोकसत्ता आणि इतर माध्यमांनी हा प्रश्न वारंवार पुढे आणल्यानंतर शासनाने निर्णयात सुधारणा केली आहे.
काय बदलले? – नवीन शासन निर्णयाची ठळक माहिती
CAP च्या कोणत्याही फेरीतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती लागू.
CAP नंतर रिक्त जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरावरील प्रवेशालाही योजना लागू.
विद्यार्थ्यांचा प्रवेश नवीन किंवा थेट द्वितीय वर्षासाठी असला तरी, तो CAP प्रक्रियेअंतर्गत असणे आवश्यक.
योजना खालील अभ्यासक्रमांवर लागू राहील:
पदवी आणि पदव्युत्तर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील सर्व अभ्यासक्रम
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागातील अभ्यासक्रम
का होता अन्याय?
शेवटच्या फेरीतील आणि संस्थास्तरावरील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना, शिष्यवृत्तीसाठी पात्र असूनही, शिक्षण विभागाच्या धोरणांमुळे पूर्ण शुल्क भरावे लागत होते. मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांवर याचा मोठा बोजा पडत होता.
राज्य शासनाच्या सुधारित निर्णयामुळे आता सर्व पात्र विद्यार्थ्यांना समान लाभ मिळणार असून, शेवटच्या फेरीतील प्रवेशही शिष्यवृत्तीसाठी मान्य मानला जाणार आहे.















Leave a Reply