विधी विभागात प्राध्यापकाची नियुक्ती प्रकरण; विधी विभागात नियम डावलून नातेवाईकाची प्राध्यापकपदी वर्णी ; कुलगुरूंकडे लेखी तक्रार
पुणे |सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विधी विभागात अपात्र उमेदवाराची अतिथी प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा गंभीर आरोप विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने केला आहे. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी समितीने कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विद्यापीठातील प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे आणि विधी विभाग प्रमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ही नियुक्ती केली असल्याचा आरोप समितीने केला आहे. संबंधित उमेदवाराकडे सेट, नेट किंवा पीएच.डीपैकी एकही पात्रता नसताना अतिथी प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे समितीचे म्हणणे आहे. या संदर्भात विधी विभाग प्रमुख यांच्याशी बोलण केल असता त्यांनी आता या विषयावर बोलु शकत नाही असे उत्तर दिले.
विद्यापीठातील अधिकारी आपापल्या नातेवाईकांना – कुणाची पत्नी, नवरा, भाची, मेहुणी, मामी, मुलगा-मुलगी – यांना पदांचा गैरवापर करून विद्यापीठात घेऊन येत असल्याचाही गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
समितीचे अध्यक्ष राहुल ससाणे यांनी इशारा दिला आहे की, “या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांचा राजीनामा न घेतल्यास विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल.”















Leave a Reply