प्राध्यापक भरतीसाठी मुदतवाढ की वेळकाढूपणा? उमेदवार वैतागले; प्राध्यापक भरतीचा चेंडू राज्यपालांच्या कोर्टात
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील १११ शिक्षकीय पदांसाठीच्या भरती प्रक्रियेत पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर होताच उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे. अनेक महिन्यांपासून भरती प्रक्रियेची प्रतीक्षा करणारे उमेदवार विद्यापीठ प्रशासनाच्या या सततच्या विलंबामुळे त्रस्त झाले आहेत.
जाहिरात क्र. २८ (दि. १३ सप्टेंबर २०२४) अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक अशा १११ शासनमान्य पदांची भरती जाहीर करण्यात आली होती. पण त्या घोषणेनंतर प्रक्रिया वारंवार पुढे ढकलली जात असून ठोस उपाययोजना आणि कारवाईचा अभाव असल्याची टीका उमेदवारांकडून केली जात आहे.
अनेकदा मुदतवाढ – उमेदवारांचा रोष वाढला
भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत यापूर्वीही अनेकदा वाढवण्यात आली. ८ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर हा कालावधी देऊनही पुन्हा ८ डिसेंबर ते २१ डिसेंबर अशी नवी मुदत जाहीर करण्यात आली.
उमेदवारांचे म्हणणे आहे की “वारंवार मुदतवाढ देऊन प्रशासन मुद्दाम वेळकाढूपणा करत आहे. भरती प्रक्रिया सुरू होणार की नाही याबाबतच शंका निर्माण झाली आहे.”
६ ऑक्टोबर २०२५ च्या नवीन नियमांवरून गोंधळ
महाराष्ट्र शासनाच्या ६ ऑक्टोबर २०२५ च्या नवीन नियमांनुसार प्राध्यापक भरती प्रक्रियेत काही बदल सुचवण्यात आले आहेत. या बदलांवर पुनर्विचार करण्याची मागणी सुरू असून विद्यापीठे व शासन यांच्यात समन्वयाचा अभाव दिसत असल्याचे उमेदवारांचे मत आहे.
प्राध्यापक भरतीचा चेंडू राज्यपालांकडे
नवीन नियमांवर सुधारणा करण्याची मागणी शिक्षक संघटनांनीही केली आहे. त्यामुळे ही संपूर्ण भरती प्रक्रिया आता राज्यपालांच्या मंजुरी आणि पुढील निर्णयावर अवलंबून राहिली आहे. राज्यपाल हेच विद्यापीठाचे कुलाधिपती असल्याने अंतिम निर्णयाची जबाबदारी त्यांच्यावर येते.
नियम स्पष्ट होईपर्यंत किंवा स्थिर धोरण जाहीर होईपर्यंत भरती प्रक्रिया पुढे जाण्याची शक्यता आहे. पण उमेदवारांच्या करिअरचा प्रश्न असल्याने विलंब टाळणे अत्यावश्यक आहे. वारंवार होणाऱ्या बदलांमुळे उमेदवार संभ्रमात असून लवकरात लवकर अंतिम वेळापत्रक जाहीर करण्याची आमची मागणी आहे.
-डॉ. हर्ष गायकवाड , सिनेट सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
प्राध्यापक भरती प्रक्रिया नेमकी केव्हा मार्गी लागणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. मुदतवाढ नको, स्पष्ट निर्णय हवा. भरती कधी होणार हे ठामपणे सांगा.
उमेदवार, प्राध्यापक भरती, विद्यापीठ
















