पुणे विद्यापीठात ‘प्राणी कल्याण समिती’ स्थापन करण्याची मागणी विद्यार्थी काँग्रेसचे सचिव अक्षय कांबळे यांनी एका निवेदनाद्वारे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांच्याकडे केली आहे.
पुणे: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मूल्यांवर आधारित शिक्षणावर भर देते आहे आणि सर्व सजीव प्राण्यांप्रती करुणा बाळगणे ही सर्व सुशिक्षित नागरिकांची जबाबदारी आहे. या संदर्भात, विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) १३ जून २०२५ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सर्व उच्च शैक्षणिक संस्थां विद्यापीठ व महाविद्यालय त्यांच्या कॅम्पसमध्ये प्राणी कल्याण समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या परिपत्रकाचा संदर्भ घेऊन विद्यार्थी काँग्रेसचे सचिव अक्षय कांबळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात देखील प्राणी कल्याण समिती स्थापन करण्याची मागणी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे. कांबळे यांनी म्हटले आहे की, ही समिती स्थापन करताना विद्यार्थी संघटना आणि त्यांच्या कायदेशीर सल्लागारांना सल्लामसलत प्रक्रियेत समाविष्ट करावे.
प्राणी कल्याण समितीचे उद्दिष्ट
प्राणी कल्याण समितीचा उद्देश प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणे आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे आहे. या समित्या प्राणी कल्याण कायदे, पर्यावरणीय नीतिमत्ता, प्राणीजन्य रोग इत्यादींवर व्याख्याने, कार्यशाळा, चित्रपट प्रदर्शन आयोजित करू शकतात. या सामाजिक कार्यात विद्यार्थ्यांचा सहभाग त्यांच्या सर्वांगीण विकासात मदत करेल आणि असा विश्वास आहे की शैक्षणिक जबाबदारी सोबतच सामाजिक संवेदनशीलता देखील वाढेल.
सर्व सजीव प्राण्यांबद्दल प्रेम आणि करुणा दाखवणे ही आपली जबाबदारी आहे. शिक्षणामुळे केवळ बौद्धिक विकासच झाला पाहिजे असे नाही तर त्यामुळे प्राण्यांबद्दल सामाजिक संवेदनशीलता आणि करुणा देखील वाढली पाहिजे. प्राणी कल्याण समिती स्थापन करून आपण ही कल्पना प्रत्यक्षात आणू शकतो, म्हणून विद्यापीठाने लवकरच प्राणी कल्याण समिती स्थापन करावी अशी आमची मागणी आहे.
– अक्षय कांबळे, सचिव, राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस

















