विद्यापीठात इंजिनीअरिंगच्या इयरड्रॉप विद्यार्थ्यांतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले तसेच २०१९ बॅचच्या विद्यार्थ्यांनी कॅरीऑनची मागणी निवेदनाद्वारे कुलगुरूंकडे केली त्यावर कुलगुरूंनी कायद्याची बाजु तपासून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन आंदोलक विद्यार्थ्यांना दिले.
पुणे : नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयुआय), तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) २०१९ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष पुनर्परीक्षा किंवा कॅरी ऑन संधी देण्याच्या मागणीसाठी बॅरीगेट्स तोडुन तीव्र आंदोलन करण्यात आले . यावेळी शहर व जिल्हा सरचिटणीस महेश अनिल कांबळे यांनी विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष पेपर गळतीकडे वेधले असून परीक्षेपूर्वीच काही प्रश्नपत्रिका टेलीग्रामवर व्हायरल झाल्यामुळे अंतिम वर्षातील अनेक विद्यार्थ्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप केला. यावेळी आंदोलकांतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, पेपर लीकमुळे अनेक विद्यार्थी मागे पडले असून, काहींना वर्षभराची गॅप देखील पडली आहे. एखाद्या कॉलेजमध्ये फक्त पाच विद्यार्थ्यांचे इयरड्रॉप झाले असल्यास, त्या विद्यार्थ्यांचे वर्ग कसे भरवले जातील? लेक्चर कसे घेतले जातील? याविषयी विद्यापीठाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी एनएसयुआयने मागणी केली आहे.
आंदोलन स्थळी विद्यार्थी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव अक्षय जैन, विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, आलसी इंजिनीयर चॅनेलचे रोनक खाबे, महेश कांबळे, राज जाधव, तेजस बनसोड, अभिषेक पवार, सचिन भाडख, वैभव महाडिक, अभिषेक जाधव, रोहित निकम, श्रद्धा डोंड, यश जाधव, साहिल चव्हाण, एनएसयुआयचे प्रवक्ते अविनाश सोळुंके आदी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी कॅरीऑन किंवा पुरवणी परीक्षेसंदर्भात निवेदने सादर केली आहेत. जे विद्यार्थी अशी मागणी करत आहेत, ते सर्व विद्यार्थी त्या त्या वर्षात किमान 50 टक्के श्रेयांक प्राप्त करू शकलेले नाहीत. परिणामी विद्यापीठ नियमानुसार हे सर्व विद्यार्थी त्या त्या शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या वरील मागणीसंदर्भात विद्यार्थीहिताच्या दृष्टीने विचार करून यासंदर्भातील कायदेशीर बाबी तसेच संबंधित शिखर संस्थांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.”
प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ
“विद्यापीठ प्रशासन नेहमीच विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून विद्यार्थी हिताचे निर्णय घेत असते. विद्यापीठाने ह्याही अगोदर विशिष्ट परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, असे निर्णय घेतले आहेत. ह्यावेळीही ह्यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन आणि नियमांच्या अधीन राहून निर्णय घेतला जाईल.”
प्रा. डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

















