दहीहंडीच्या निमित्ताने: दहीहंडी म्हणजे समाजातील स्तर; समाजातील प्रत्येक स्तर महत्वाचा- डॉ. पराग काळकर
आपल्या वैयक्तिक आयुष्यात प्रगती करताना, समाजाच्या विविध स्तरांवरील अनेक घटक आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करत असतात, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. माझ्या सुरक्षिततेसाठी घराबाहेरील सुरक्षा कर्मचाऱ्यांपासून, पोलीस, वाहतूक मदतनीस, ते देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करणारे आपले तिन्ही दलांचे सैनिक, अशी सर्व यंत्रणा कार्यरत असते. या सर्वांचे ऋणी राहून समूह जीवनाचा पाया अधिक भक्कम केला पाहिजे.
समाजाची भक्कम इमारत उभी करायची असेल, तर काही घटकांना स्वतःला पायामध्ये कायम गाडून घ्यावे लागते, याची जाणीव शिखरावर पोहोचलेल्या घटकांनी ठेवली, तरच पुढील काळातही आपले समाजजीवन अधिक समृद्ध होण्यास मदत होईल. हा समन्वय, सौहार्दता, सहकार्य आणि सहजीवनाचा पाया कमकुवत झाला, तर वरील मनोरा अस्थिर होऊन क्षणात कोसळू शकतो.
कृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने, माझ्या आयुष्यातील सर्व घटकांप्रती माझ्या जाणिवा जागृत होऊन त्यांच्यासाठी माझ्या कर्तव्याची जाणीव व्हावी, यासाठीच हा लेखनाचा प्रपंच. (लेखक डॉ पराग काळकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत)


















