श्रावण पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमा: आपलं रक्षाबंधन © डॉ पराग काळकर
नारळी पौर्णिमा विशेष
बहीण-भावाच्या नात्यामधील पवित्र बंधन म्हणजे रक्षाबंधन. हा धागा प्रेमाचा, स्नेहाचा, काळजी वाहणारा आणि ‘मी आहे तुला काहीही लागलं तर’ अशी ग्वाही देणारा आहे. खरं तर अनेक घरांमध्ये फक्त बहिणी-बहिणी अथवा भाऊ-भाऊ असतात. अशा नात्यांमध्येसुद्धा काळजी घेण्याचे, संरक्षणाचे बंध घट्ट विणले जायला हवेत.
राखी कशापासून बनवलेली आहे आणि तिची किंमत किती आहे, यापेक्षा त्यामागे भावनिक ओलावा किती आहे, यातून तिची खरी किंमत ठरते. धागा कदाचित काळाच्या ओघात नष्ट होईलही; परंतु या निमित्ताने निर्माण झालेला भावनिक बंध जन्मभर पुरणारा असतो. राखीचा धागा हा नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुरुषार्थाचे पवित्र बंधन आहे.
ह्या एवढ्याशा धाग्याने कितीतरी मने जुळून येतात. त्यांना भावनांचा ओलावा मिळतो व मन प्रफुल्लित होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात नाती जपण्यासाठी अनेकदा इच्छा असूनही वेळ नसतो. रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा बहिणीला भेटून आठवणींना उजाळा देता येतो. एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्त्वाचे ठरतात.
रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजाला वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो, हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे.
हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा आता ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटून व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात. असा हा दिवस अगदी लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच जण आनंदाने साजरा करतात. हल्ली तर घरात एकच मुलगा/मुलगी असताना या राखीच्या निमित्ताने दोन परिवार एकमेकांच्या आणखीनच जवळ येत आहेत.
या निमित्ताने आपल्याला समाजातील इतर भगिनींचेसुद्धा रक्षण करण्याची जबाबदारी आहे, याचेही भान ठेवले पाहिजे. जसे मला माझ्या बहिणीची रक्षा करायची आहे, तशी इतर माता-भगिनींना माझ्या वर्तणुकीपासून त्रास होणार नाही याची जबाबदारीसुद्धा मी मनापासून स्वीकारली पाहिजे. माझं माझ्या भगिनींप्रती असलेलं कर्तव्य फक्त एका दिवसाचं नसून, माझ्या चौखूर धावणाऱ्या मनाला घातलेला तो एक पवित्र बांध आहे. माझं आचरण आणि जबाबदारीचं भान या निमित्ताने पुन्हा आठवलं पाहिजे.
बहिणीनेसुद्धा आपल्या भाऊरायाला सत्कर्माप्रती जाण्याची आणि सद्विचारांनी वागण्याची ओवाळणी प्रथम मागितली पाहिजे. भाऊ-बहिणींचं वय जवळपास असल्यामुळे हक्काने आणि अधिकाराने एकमेकांना सहज काही सांगता येतं.
आपल्या देशातील माता-भगिनी खऱ्या अर्थाने सुरक्षित होतील, त्या दिवशी रक्षाबंधन साजरे झाले असे म्हणता येईल. आम्हा सर्वांना या निमित्ताने आपापल्या कर्तव्याची आठवण व्हावी हीच सदिच्छा.
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत.)




















Leave a Reply