भाद्रपद शुद्ध चतुर्थी: पुण्यात गणरायाची पारंपरिक प्रतिष्ठापना; आनंदाचे डोही आनंद तरंग: गणेशोत्सवाचा जल्लोष- डॉ. पराग काळकर

आज भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी आणि जगभरातील मराठी माणसांच्या घरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात श्री गणरायाची षोडशोपचार पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. विद्येचं माहेरघर असलेल्या आपल्या पुण्यात पारंपरिक वेशभूषेतील तालवाद्ये आणि शंखांच्या निनादात मिरवणूक काढून गणरायाची स्थापना करण्यात येत आहे.

पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती, तसेच मानाचे इतर गणपतीही या सुंदर आणि मनोहारी मिरवणुकीत सहभागी आहेत. प्रत्येक गल्ली आणि रस्ता ढोल-ताशा पथकांच्या शिस्तबद्ध निनादाने आणि भगव्या पताकांनी भारलेला दिसत आहे. या मिरवणुकीत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सर्वसामान्य लोकही या ऐश्वर्यपूर्ण वातावरणात आनंदित होऊन आपल्या मुलाबाळांसह हा भव्य सोहळा डोळ्यांत साठवून घेत आहेत.

काळ बदलत असला तरी, ऐतिहासिक गणेशोत्सव अधिक सुंदर, नयनरम्य आणि आपली परंपरा जपताना दिसत आहे. महिन्यांच्या मेहनतीने ढोल-ताशा पथकांचं वादन करणारी तरुण मुले आणि मुली या सोहळ्याला अधिक आकर्षक बनवत आहेत. महिलांचा लक्षणीय सहभाग आणि त्यांची पारंपरिक वेशभूषा जगभरातील भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.

‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या उक्तीप्रमाणे, हा जनसागर अनंत चतुर्दशीपर्यंत रात्रंदिवस पर्वा न करता, या ऐश्वर्यवान सोहळ्याचा मनसोक्त अनुभव घेईल. हा सोहळा म्हणजे जणू इंद्रलोकाचं पृथ्वीवर अवतरण झाल्याचा भासच आहे. राजेशाही थाटातील सुंदर वाद्यांचा निनाद आणि पारंपरिक वेशभूषेतील मिरवणूक डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे.

या मनोहारी, ऐतिहासिक आणि स्वर्गाची अनुभूती देणाऱ्या सोहळ्याचे साक्षीदार आणि प्रत्यक्षदर्शी होण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आहे. तहान-भूक, वय आणि प्रतिष्ठेची बंधने झुगारून सर्वांना एकत्र आणणारा हा आनंदाचा सोहळा असाच अनेक सहस्रके दिमाखात संपन्न व्हावा, हीच श्रीगणेश चरणी प्रार्थना.

(लेखक डॉ. पराग काळकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत)

Related posts:

See also  सार्वजनिक विद्यापीठे, अशासकीय महाविद्यालयांमधील रिक्त पदांच्या भरतीस वेग येणार; अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!