व्रत-वैकल्यांचा श्रावण महिना संपून, भाद्रपद सुरू झालाय तो गणेश आगमनाचे वेध घेऊन. पावसाळा संपून ग्रीष्म ऋतूचे आगमन होताना, धरती आणि निसर्ग हिरवाईने नटले आहेत. गणेश पूजनाचे माध्यम आम्हाला निसर्गात विहार करायला प्रवृत्त करत आहे. पावसाळ्यात असंख्य वनस्पती, गवत जागोजागी उगवलेले असते. पूजेच्या तयारीच्या निमित्ताने याच गवत आणि झुडपांमधून मला आवश्यक असलेल्या अनेक पत्री शोधून निवडायच्या आहेत, तसेच गवताच्या ताटव्यामधून दुर्वांचा शोध घ्यायचा आहे. रानोमाळ पसरलेल्या विविधरंगांच्या सुंदर नाजूक फुलांच्या ताटव्यांमधून, सुंदर फुले वेचून आणायची आहेत.

नीर-क्षीर विवेक करून, स्वतः निसर्गाच्या सानिध्याचा आस्वाद घेताना, माझ्या ओंजळीत मावेल एवढेच पूजेसाठी आणायचे आहे. साधनांचा अतिरेक झाला की साध्य मागे पडतात. निसर्गाने भरभरून दिलेले आवश्यक असेल तेव्हा आणि तेवढेच घेतल्यास निसर्गाचा ऱ्हास थांबेल. सोबत स्वच्छ, चांगली मृत्तिका आणून, माझ्या स्वतःच्या हाताने त्याची पार्थिव मूर्ती माझ्या मनातील गणेश रूपात साकारण्याचा आनंद घ्यायचा आहे. उपलब्ध असलेले नैसर्गिक रंग लावून छान सजवायचे आहे. मन शांत करणारे आणि आनंदित करणारे असे सुंदर रूप साकार करायचे आहे.

मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करून ईश-तत्वाला आवाहन करायचे आणि मनोभावे पूजन, आराधना करायची, अशी सुंदर संकल्पना आहे. पावसाळ्यात माझा वावर कमी झालेला असतो, या निमित्ताने आपण पुन्हा निसर्गात जाऊन त्याचे भव्य, मनोहारी रूप अनुभवतो. सहस्र हातांनी भरभरून देणारा निसर्ग आम्हाला खूप काही सुख-समाधान देऊन जातो.

गणेशाचे साकार रूप मला अनेक संदेश देते. मोठे मस्तक मला कोणतीही गोष्ट बुद्धीच्या आधारे तपासून पाहायला सांगते. विशाल कानातून कोणतीही गोष्ट प्रथम शांतपणे ऐकण्याची आणि लंबोदर रूपात अनेक गोष्टी उदरात सामावून घेण्याचा, पण व्यक्त होताना बुद्धीचा वापर करण्याचा संकेत मिळतो. थोड्या अंतर्वक्र सोंडेतून कोणतीही कृती करताना पहिले आपल्याच अंतर्मनात डोकावून पाहण्याची जाणीव होते. आपल्या भक्ती आणि शक्तीच्या प्रदर्शनापेक्षा मनातील भाव आणि श्रद्धा जास्त महत्त्वाची आहे. ‘पाहावे आपणासी आपण’ या उक्तीप्रमाणे आपल्यामधील स्वरूपाचा शोध आणि जाणीव यानिमित्ताने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे

See also  UGC व AICTE होणार कालबाह्य? विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक : 2025 संसदेत सादर

(लेखक डॉ. पराग काळकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत.)