दसरा: आनंद, कर्तव्य आणि सामाजिक समरसतेचा उत्सव – डॉ. पराग काळकर

दसरा: आनंद, कर्तव्य आणि सामाजिक समरसतेचा उत्सव – डॉ. पराग काळकर

दसरा हा सण मोठा आहे; आनंदाला तोटा नाही. आपला देश कृषीप्रधान असल्याने, पूर्वापार हा दिवस पावसाळ्यात पेरलेले पीक घरात आल्यानंतर शेतकरी साजरा करत असत. निसर्गदेवता जसे एक दाणा पेरल्यावर ओंजळभर धान्य परत देते, त्याचप्रमाणे माझ्या जीवनात जे जे काही मिळाले, त्यापेक्षा अधिक काही मी समाजाला परत देण्याचा प्रयत्न करायला हवा. “जीवनात जेवढे घेणे (आदान) होईल, त्याहून अधिक देणे (प्रदान) असावे. हे भगवंता, माझी ही प्रार्थना पूर्ण कर,” म्हणजेच “जीवने यावदादानं स्यात् प्रदानं ततोऽधिकम्। इत्येषा प्रार्थनाऽस्माकं भगवन् परिपूर्यताम्॥” असा यामागे उदात्त संदेश आहे.

सीमोलंघन: जाणिवांची नवी सीमा

सीमोलंघनाच्या निमित्ताने माझ्या चाकोरीबद्ध जीवनाच्या बाहेर डोकावून निसर्गात, समाजात डोळसपणे बघायला हवे. माझे कुटुंब, माझा परिवार, माझ्या सभोवतालचा परिसर आणि माझा देश यांच्याप्रती माझी कर्तव्ये पार पाडताना माझ्या जाणिवा बोथट होत नाहीत ना, याची दक्षता घ्यायला हवी. माझ्याबाहेरसुद्धा एक विश्व आहे. समाजातील अनेक घटक—वृद्ध, आजारी माणसे, गरजू, विद्यार्थी—यांच्यासाठी माझ्या दिवसातले काही क्षण देता येतील का, हे पाहिले पाहिजे. एवढे नाही जमले तरी त्यांच्या दैनंदिन (नैमित्तिक) आयुष्यात माझ्यामुळे अडथळा, ताण किंवा त्रास निर्माण होत नाही ना, याचा मागोवा घेतला पाहिजे. समाजात सर्व वयाचे, आर्थिक आणि सामाजिक स्तराचे लोक (घटक) असतात. माझ्यामुळे या सर्वांचा आनंद कसा द्विगुणित होईल, असा प्रयत्न केला तरच मी खऱ्या अर्थाने माझ्या जाणिवांचे सीमोलंघन केले, असे होईल.


समाजातील वेगवेगळे समूह आपापल्या पद्धतीने जीवन जगत असतात. हे विविधांगी समूहजीवन मान्य करूनही, ते एका आंतरिक सूत्राने जोडायला हवे. हेच सामाजिक समरसतेचे सूत्र अधिकाधिक घट्ट करण्यासाठी अशा सामूहिक उत्सवांची आवश्यकता असते. विजयादशमी हा त्यातील महत्त्वाचा उत्सव आहे. समाजातील विषमता नष्ट करून, संपूर्ण समाज एकात्म व एकरस करण्याची प्रतिज्ञा करण्याचा हा दिवस आहे.

See also  कंत्राटी प्राध्यापकांना नियमित प्राध्यापकांइतकेच वेतन देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

शस्त्रपूजन: सामर्थ्याचा सदुपयोग

दसर्‍याच्या दिवशी वायुमंडलातील तेजरूपी क्षात्रलहरींना पूरक अशा प्रतीकाचे, म्हणजेच शस्त्रांचे पूजन करतात. माझ्या ताकदीचे, सामर्थ्याचे आणि अहंकाराचे प्रदर्शन हा याचा हेतू नसून, समाजातील नकारात्मक व दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना धाक बसावा आणि दीन-दुबळ्या घटकांना सकारात्मक आधाराची जाणीव व्हावी, असा हेतू असावा. माझ्यातील सद्गुणरूपी शस्त्र आणि माझी वागणूक कायम समर्थ उक्तीप्रमाणे “आपल्या पुरुषार्थ आणि वैभवाने बहुतांना सुखी करावे, परंतु कष्ट करू नये, नाहीतर ती राक्षसी वृत्ती आहे,” अशी असायला हवी. माझ्या समाजातील माता-भगिनींना माझा आधार वाटला पाहिजे.

रावणदहन: दुर्गुणांचा त्याग

जरा धांडोळा घेऊन (आत्मपरीक्षण करून) बघा: मी माझ्यामधील सद्गुणांचा गुणाकार आणि अवगुणांचा भागाकार केला पाहिजे. “अवगुण सोडले की आपोआप जातात, उत्तम गुणांचा अभ्यास केला की ते आत्मसात होतात,” याप्रमाणे काही क्षण ‘आपणासी आपण’ पाहावे. स्वतःच्या अंतरंगात डोकावून बघा. माझ्या अंतरंगातील नकारात्मक विचार, राग, मद, मत्सर, अहंकार, द्वेषरूपी रावणाला जाळून नष्ट केले पाहिजे. आपणही आपल्या जीवनात दुर्गुणांचा त्याग करून सद्गुण आत्मसात केले पाहिजेत.

शुभेच्छा आणि संकल्प
विजयादशमीच्या निमित्ताने आपण सर्वांनी आपल्या जीवनातील अंधार, रोगराई आणि अपयशाच्या सीमा ओलांडून सुख, समृद्धी, अखंड समाधान आणि आनंदाची अनुभूती घेताना भरभराटीकडे व यशस्वीतेकडे वाटचाल करायला हवी. दसऱ्याच्या निमित्ताने आपण सगळ्यांनीच सकारात्मक ऊर्जेचं सोनं वाटायला सुरुवात करायला हवी.
चला तर, ‘अमूल्य पर्यावरणस्नेहाचं नि सामाजिक भान जपण्याचं वैचारिक सोनं लुटू या.’ दसऱ्याच्या आपणास आणि कुटुंबीयांस मनःपूर्वक शुभेच्छा! (लेखक डॉ पराग काळकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!