मैत्री दिन विशेष
मैत्री प्रथम स्वतःशी करा, स्वतःच्या गुणांशी करा, आपल्या स्वतःच्या अस्तित्वाशी करा, मैत्री स्वतःच्या अंतर्मनाशी करा, मैत्री स्वतःच्या शरीराशी करा. मैत्री स्वतःच्या आरोग्याशी करा, माझे सुंदर अबोल अबोध अलवार अस्तित्व अखंडितपणे मलाच प्रथम जपायचे आहे या जाणिवेशी करा. मैत्री जीवनातल्या चैतन्याशी करा, मैत्री स्वरूपाशी अन् स्वानंदाशी करा. मैत्री स्वतःच्या मनामधील सुंदर विचारांशी सुसंवाद साधून करा.
मैत्री सर्व नात्यांशी करा, मैत्री हळुवार भावनांशी करा, मैत्री उगवत्या तेजोमय सूर्याशी करा, मैत्री आनंद पसरवणाऱ्या टिपूर चांदण्याशी करा, मैत्री खळखळणाऱ्या अन् सर्वस्व झोकून वाहणाऱ्या प्रपाताशी करा, मैत्री आपल्या उत्कट भव्य ध्येयाशी करा, मैत्री हिमालयासारख्या उत्तुंग मूल्यांशी करा, मैत्री अनंत हस्ते भरभरून देणाऱ्या निसर्गाशी करा, मैत्री पर्यावरणाशी करा, मैत्री सामाजिक बांधिलकीशी करा, मैत्री आपले मन मोकळे करणाऱ्या सुहृदांशी करा, मैत्री ध्येयवेड्या सकारात्मक व्यक्तिमत्वांशी करा, मैत्री श्रीकृष्णासारखी करा.

माझ्या जीवनामधल्या सुख-दुःखांच्या प्रत्येक लाटेवर स्वार होताना या मैत्रीची अखंड साथ लाभावी. हे मैत्रीचे उभे-आडवे धागे सुंदर तरल वस्त्राप्रमाणे घट्ट विणलेले असावेत अन् त्यामधील एखाद्या सोनेरी धाग्याने माझे आयुष्य उजळून जावे. माणसाच्या जीवनात जन्मापासूनच्या प्रवासात अनेक मैत्रीचे धागे जुळतात आणि अतूट नात्याची एक सुंदर नाजूक वीण गुंफली जाते. त्यामधील उबदार भावना पुस्तकात जपलेल्या मोरपिसाप्रमाणे जतन केलेल्या असतात. एखादी जुनी अत्तराची कुपी उघडावी तसा एखादा मित्र भेटल्यावर तो मैत्रीचा सुगंध आसमंतात दरवळतो. मैत्री स्वार्थासाठी नसावी, मैत्री क्षणिक सुखासाठी नसावी, मैत्री दिखाऊ प्रदर्शनासाठी नसावी, मैत्री माझ्या सवयी बिघडवणारी नसावी, मैत्री रूप-रंगाच्या पलीकडे जाणारी असावी.

रक्ताच्या नात्यापलीकडे असणारी पण नात्यांपेक्षा घट्ट असणारी अशी ही शब्दांवाचून भाव समजून घेणारी आणि सावलीप्रमाणे ऊन-पावसात सोबत करणारी “मैत्री” माझे आयुष्य प्रफुल्लित, पुलकित करून जावी. अशा या माझ्या आयुष्याला परिसस्पर्श करणाऱ्या मैत्रीला मनःपूर्वक शुभेच्छा
(लेखक डॉ. पराग काळकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत )




