श्रावण महिन्यात निसर्ग आपले आरस्पानी सौंदर्य भरभरून देत असतो. भारतीय संस्कृतीमध्ये श्रावणातील विविध सण-उत्सव आपल्याला कधी अंतर्मुख व्हायला, तर कधी बहिर्मुख व्हायला प्रवृत्त करतात. निसर्गातील गवतापासून (दुर्वा), अनेक औषधी पत्रींपर्यंत आणि वटवृक्षापर्यंत प्रत्येक घटक निसर्ग साखळीत महत्त्वाचा आहे.
पूजेसाठी आम्ही स्वतः निसर्गात जाऊन अनेक नैसर्गिक फुले आणि पत्री यांची ओळख करून घेतली पाहिजे. हा मूळ हेतू सोडून आम्ही बाजारात मागतील ते पैसे देऊन मिळेल ती ओरबाडलेली पाने घेऊन येतो. समजून घेऊन आणि स्वतः ती गोळा करण्यात निसर्गाशी जवळीक साधून मिळणारे समाधान महत्त्वाचे आहे. यातून मिळणारी मनःशांती आणि निसर्गाची ओळख आपल्याला कळत-नकळत त्याची जपणूक करण्याची जाणीव करून देते.
नागपंचमीसारखा सण निसर्ग साखळीतील अनेक लहान-मोठ्या घटकांचे महत्त्व अधोरेखित करतो. आपल्या जीवनासाठी अत्यावश्यक घटक पोहोचवण्यात अनेक नैसर्गिक साधनांचा समावेश असतो. आपला सोबती असलेला समुद्र, त्याचेही पूजन करून आपण त्याचे आभार मानतो. भाऊ-बहिणींच्या नात्याचा धागा राखीपौर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा अधोरेखित होतो.
विविध व्रते मला अंतर्मुख व्हायला आणि माझ्या मनोव्यापाराचा धांडोळा घ्यायला मदत करतात. खरे तर, मनुष्याचे सर्वाधिक अनारोग्य प्राथमिकतः मनोव्यापार बिघडल्याने होत असते. यासाठीच तर समर्थ रामदासांनी ‘मनाचे श्लोक’ लिहून ठेवले आहेत. आपल्या व्रत, सण-उत्सवाच्या कर्मकांडात आणि बाह्य प्रकटनामध्ये शक्ती आणि पैसे खर्च करण्याऐवजी त्यामागील भावना समजून घेतल्यास निश्चित फलप्राप्ती होईल.
(लेखक डॉ. पराग काळकर हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत.)




















Leave a Reply