NIRF रॅंकींग 2025 चा अहवाल प्रसिद्ध ; NIRF रॅंकींग मध्ये आयआयटी, आयआयएम आणि केंद्रीय विद्यापीठांचा डंका; जागतिक गुणवत्तेच्या दिशेने एक निर्णायक पाऊल…
नवी दिल्ली: शिक्षण मंत्रालयाने 4 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा (NIRF) 2025 वर आधारित 10 वी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध केली. KPMG च्या अहवालानुसार, हा अभ्यास भारतातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत, संशोधनात आणि समावेशकतेत झालेल्या दशकभराच्या प्रगतीचे प्रतिबिंब आहे. 2025 मध्ये 7,692 संस्था सहभागी झाल्या, 2016 च्या 2,426 च्या तुलनेत तीनपट वाढ झाली असून यंदा प्रथमच सतत विकास ध्येय (SDG) या नव्या श्रेणीचा समावेश करण्यात आला. तसेच परत घेतलेल्या संशोधन प्रकाशनांवर नकारात्मक गुणपद्धती लागू करून शैक्षणिक प्रामाणिकतेला बळकटी देण्यात आली. यामुळे NIRF 2025 मध्ये भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता, पारदर्शकता आणि स्पर्धेचे नवीन पर्व सुरू झाले असून भारताची रँकिंग प्रणाली आता संख्येपेक्षा गुणवत्तेकडे वाटचाल करत आहे. तसेच जागतिक उत्कृष्टता व गुणवत्तेच्या दिशेने एक निर्णायक पाऊल आहे असे या अहवालावरुन स्पष्ट होते.
शीर्ष संस्थांचा परफॉर्मन्स
आयआयटी श्रेणीत IIT मद्रास अव्वल राहिले.
विद्यापीठ श्रेणीत IISc बेंगळुरू प्रथम, JNU दुसरे आणि जामिया मिलिया इस्लामिया चौथ्या स्थानावर.
अभियांत्रिकी विभागात IIT मद्रास, IIT दिल्ली आणि IIT मुंबई अव्वल.
व्यवस्थापनात IIM अहमदाबाद, IIM बेंगळुरू आणि IIM कोझिकोड यांनी स्थान कायम ठेवले.
महाविद्यालयांमध्ये दिल्लीतील हिंदू कॉलेज, मिरांडा हाऊस आणि हंसराज कॉलेज अव्वल तीन ठरले.

संशोधन, पीएचडी आणि नवोपक्रमात प्रगती
भारताचा जागतिक संशोधनातील वाटा 2017 मध्ये 3.5% वरून 2024 मध्ये 5.2% झाला आहे.
पीएचडी प्रवेशात 21% आणि पूर्णतेत 49% वाढ झाली आहे.
2022 ते 2024 दरम्यान पेटंट दाखल्यांमध्ये तीनपट वाढ झाली, ज्यामुळे भारत जगातील शीर्ष सहा देशांमध्ये आला आहे.
या प्रगतीमुळे भारताची शैक्षणिक विश्वासार्हता जागतिक स्तरावर बळकट झाली आहे.
राज्यनिहाय कामगिरी
तमिळनाडूने 20 विद्यापीठांसह पहिल्या 100 मध्ये अव्वल स्थान राखले.
महाराष्ट्र (11) आणि उत्तर प्रदेश (9) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर.
हरियाणातील दोन नवीन संस्था यादीत आल्या, तर केरळ आणि कर्नाटकातील काही संस्था मागे पडल्या.
ही वाढ देशातील उच्च शिक्षण संस्थांमधील स्पर्धा आणि गुणवत्ता वृद्धीचे सकारात्मक चित्र दर्शवते.
खाजगी विद्यापीठांची झेप
मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन, बिट्स पिलानी आणि अमृता विश्व विद्यापीठम यांनी उल्लेखनीय प्रगती केली.
आता पहिल्या 100 विद्यापीठांपैकी सुमारे 44% खाजगी संस्था आहेत.
ही प्रवृत्ती खाजगी क्षेत्रातील गुणवत्तेची व संशोधनातील उन्नती दर्शवते.

क्रमवारीतील सुधारणा
NIRF 2025 मध्ये ऑनलाइन शिक्षण आणि प्रादेशिक भाषांतील अभ्यासक्रम या घटकांचा समावेश TLR (Teaching Learning Resources) मध्ये करण्यात आला.
तसेच SDG-आधारित संशोधन प्रकाशनांना संशोधन उत्पादकता (RP) मध्ये स्थान दिले गेले.
Self-citation वगळल्याने डेटाची विश्वासार्हता वाढवली गेली.
हे सर्व बदल नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) शी सुसंगत आहेत.
आज भारत हा केवळ विकासशील देश नाही, तर विचार आणि नवोपक्रम यांचे जागतिक केंद्र बनत आहे. या परिवर्तनाच्या प्रवासात शिक्षण, युवकशक्ती आणि संशोधन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या देशातील प्रत्येक तरुणामध्ये बदल घडविण्याची ठिणगी आहे. जेव्हा शिक्षण त्या ठिणगीला योग्य दिशा आणि मूल्ये देते, तेव्हाच राष्ट्र खऱ्या अर्थाने प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचते. राष्ट्राची प्रगती ही केवळ अर्थव्यवस्थेने नव्हे, तर शिक्षण, संस्कार आणि संवेदनशील नागरिकत्वाने मोजली जावी.
–प्रा. डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
“NIRF 2025 हे भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील दशकभराच्या प्रवासाचे प्रतीक आहे. पुढे संशोधन गुणवत्ता, रोजगारक्षम शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.”
–नारायणन रामास्वामी, राष्ट्रीय प्रमुख (शिक्षण व कौशल्य विकास), KPMG इंडिया
















Leave a Reply