मॅनेजमेंट कौन्सिल बैठक पुर्वी व्यवस्थापन परिषद सदस्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद ; घसरते NIRF रँकिंग व इतर विद्यार्थी प्रश्नांवर चर्चा
पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज (दि. ९ सप्टेंबर २०२५) व्यवस्थापन परिषद सदस्यांसोबत विद्यार्थी व विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण संवाद बैठक पार पडली. दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या व्यवस्थापन परिषद बैठकीपूर्वी विद्यार्थ्यांनी संघटितपणे सदस्यांची भेट घेऊन संवाद साधण्याची मागणी केली होती.
यासाठी दुपारी १२ पासून मुख्य इमारत गेटवर विद्यार्थी व प्रतिनिधी बसले होते. यावेळी एम.सी. सदस्य संदीप पालवे यांनी भेट देऊन प्राथमिक संवाद साधला. त्यानंतर दुपारी २ वाजता विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसच्या मीटिंग हॉलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी व व्यवस्थापन परिषद सदस्यांमध्ये औपचारिक बैठक झाली.
विद्यार्थी मांडलेल्या मागण्या
या बैठकीत विद्यार्थ्यांनी विविध गंभीर प्रश्न सदस्यांसमोर ठेवले. त्यामध्ये –
सर्व गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृह सुविधा उपलब्ध करून देणे.
एनआयआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठाची घसरण (३७ वरून ९१) झाल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने जबाबदारी स्वीकारावी.
प्राध्यापक पदभरतीतील (करारपद्धतीने) चौकशी करावी
पीएचडी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाची चौकशी.
पोस्ट-डॉक्टरल फेलोशिपमधील प्रकरणी चौकशी.
विद्यापीठातील प्रभारी राज संपवणे.
विद्यार्थी व संघटना प्रतिनिधींवरील दाखले व गुन्हे मागे घेणे.
मुलींच्या सुरक्षेची हमी व वसतिगृह सुविधा.
व्यवस्थापन परिषदेची प्रतिक्रिया
या बैठकीत उपस्थित सर्व व्यवस्थापन परिषद सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घेतली. त्यांनी सभागृहात हे प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले. बैठकीत विद्यार्थी प्रतिनिधींमध्ये अभिषेक शेलार, राहुल ससाणे (विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती), नितीन आंधळे, सुरज गायकवाड (रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद), ओंकार बेनके (राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस), गोरक्ष कांबळे (युवासेना), रोहीत भामरे (दलित पँथर), समाधान दुपारगुडे, मयुर जावळे आदी उपस्थित होते.
व्यवस्थापन परिषदेतील राजेंद्र विखे, बागेश्री मंठाळकर, देवीदास वायदंडे, धोंडोराम पवार, रवींद्र शिंगणापूरकर, संदीप पालवे, संगीत जगताप तसेच राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य कृष्ण भंडलकर उपस्थित होते.














Leave a Reply