७९व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा; “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” – डॉ. पराग काळकर
इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांप्रमाणे सुंदर आणि विविधतेने नटलेला माझा प्रिय भारत देश खरोखरच निसर्गाची भरभरून देणगी लाभलेला आहे. अतिभव्य हिमालयापासून उत्तुंग सह्याद्रीच्या सुंदर रांगा आपल्या सोबत आहेत. गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी अशा अगणित नद्यांनी आपले आयुष्य सुजलाम सुफलाम केले आहे. देशाच्या तीन बाजूंनी समुद्र आपले रक्षण करत आहे, तर उत्तरेकडे बर्फाच्छादित शिखरांची तटबंदी उभी आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तीनही संतुलित ऋतूंचा अनुभव घेता येणे, हे आपले भाग्यच आहे. याच महान देशात अनेक धर्म, पंथ, समूह, परंपरा गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत.
निसर्गाला खरंच विविधता आवडत असावी, कारण अनेक प्रकारचे वृक्ष, झाडे, फळे आणि फुले आपल्या देशाची शान वाढवत आहेत. सहजता आणि सोशिकता हा आपल्या रक्तात भिनलेला गुण असल्यामुळेच जगाच्या कान्याकोपऱ्यात आपले देशवासी सहज मिळून-मिसळून राहत आहेत. कर्मठ बुद्धिवादापासून सोशिक भक्तीमार्गापर्यंत अनेक मार्ग आपल्याला आपल्या इच्छेनुसार सहज स्वीकारता येतात.
एक देश, अनेक भाषा, अनेक बोली, अनेक वेशभूषा, अनेक विविध खाद्यपदार्थ, प्रार्थनेच्या अनेकविध पद्धती आणि देवता… इतका विविधतेने आणि सौंदर्याने नटलेला देश माझ्या मते जगात केवळ भारतच असावा. बाहेरच्या देशांमधील साचेबद्ध जीवन, ठरावीक ऋतू आणि एकसुरी जेवण, एखादी दुसरी भाषा याची जाणीव बाहेर राहिल्यावर होते.
आपण आपल्या देशात खूप काही करू शकतो. आज आपल्या देशातील या विविधतेची आणि नैसर्गिक सौंदर्य व साधनसंपत्तीची जपणूक करून, त्यावर अभिमान बाळगण्याची गरज आहे. देशाचे हे वैशिष्ट्यपूर्ण रूप असेच अनंत काळापर्यंत जपून त्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. येथे जन्माला आलेले अनेक युगपुरुष आपल्यासाठी दिशादर्शक कार्य आणि ज्ञानसंपदा निर्माण करून गेले आहेत. “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी” अशा माझ्या भारतमातेला शतशः नमन
(लेखक डॉ. पराग काळकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत)




