लक्ष्मण हाके व ऍड मंगेश ससाने यांच्या नेतृत्वाखाली महाज्योतीच्या पीएचडी फेलोशिप संशोधक विद्यार्थ्यांचे मुंबईच्या जुहू चौपाटी वर जलसमाधी आंदोलन

महाज्योती-2022 पासुन पीएचडी संशोधकांना नोंदणी दिनांकापासून प्रलंबित असलेली फेलोशिप तात्काळ देण्याची मागणी करण्यासाठी प्रा. लक्ष्मण हाके व ऍड मंगेश ससाने यांच्या मार्फत जीवाची पर्वा न करता मुंबई जुहू चौपाटी वर जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

महाराष्ट्र शासनातर्फे खालील जीआर प्रमाणे फेलोशिफ मंजूर करण्यात आली आहे परंतु ती अद्याप त्यांना मिळाली नाही असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

१. शासन निर्णय क्रमांक महाज्यो-२०२४/प्र. क्र.४८/संस्था, दिनांक ११ ऑक्टोबर २०२४

२. महाज्योती/पीएचडी २०२३/नागपूर/३५८०/२०२४-२५, दिनांक २४ डिसेंबर २०२४

३. महाज्योती/पीएचडी/२०२५/४४४, दिनांक १२ फेब्रुवारी २०२५

मुंबई प्रतिनिधी: दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी सारथी, बार्टी व महाज्योती या तीनही संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती, ओबीसी – भटके विमुक्त व मराठा समुदायातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून १००% दराने फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने महाज्योतीसाठी दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला.परंतु, बार्टी व सारथी संस्थांमधील पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक (१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२४) पासून फेलोशिप अदा केली गेली असताना, महाज्योती संस्थेमार्फत ओबीसी, भटके विमुक्त व एसबीसी वर्गातील पीएच.डी. संशोधकांना मात्र अन्यायकारकरीत्या केवळ दिनांक २५ जुलै २०२४ पासूनच फेलोशिप मंजूर करण्यात आली आहे. 

 

याअगोदर महाज्योती संस्थेने दिनांक २४/१२/२०२४ रोजी सर्व संशोधकांना नोंदणी दिनांकापासून सहामाही प्रगती अहवाल सादर करण्याचे परिपत्रक काढले होते. त्या सूचनेप्रमाणे बहुतेक सर्व विद्यार्थ्यांनी प्रगती अहवाल वेळेवर ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सादर केलेले आहेत.

त्यामुळे दिनांक १२/०२/२०२५ रोजी प्रसिद्ध परिपत्रकानुसार केवळ ५ महिने ६ दिवसांची फेलोशिप देण्याचा निर्णय शासन निर्णयाच्या मूळ भावनेविरुद्ध असून संशोधक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे त्यांच्या मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होत आहे म्हणून महाज्योती संस्थेतील पात्र पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना देखील इतर संस्थांच्या विद्यार्थ्यांप्रमाणे नोंदणी दिनांकापासून १००% दराने फेलोशिप मंजूर करून, मागील तीन वर्षांची थकीत फेलोशिप तातडीने एकरकमी अदा करावी, जेणेकरून या विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टळेल. अशी मागणी यावेळी जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न करणा-या पीएचडी फेलोशिप धारक संशोधक विद्यार्थ्यांनी केली आहे.

महाज्योती फेलोशिप विद्यार्थ्यांची पोलिसांकडून अटक करणे ही अत्यंत खेदजनक आणि शरमेची बाब आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्ही मागणी करतो की विद्यार्थ्यांना कोणताही गुन्हा दाखल न करता, सन्मानपूर्वक मुक्त केले जावे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये सरकारच्या दुपदरी भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करतो.

-संशोधक विद्यार्थी, महाज्योती नागपूर 

 

See also  पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीमध्ये किडे; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; आरपीआय आठवले गटाचे निवेदन; आरपीआय (आठवले गट) पिंपरी-चिंचवड शहराचे युवक शहराध्यक्ष धम्मरत्न गायकवाड यांची दोषींवर कारवाई करण्याची कुलगुरूंकडे मागणी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!