योग ही आमची परंपरा, चिकित्सा पद्धती व आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

पुणे, २१ : – योग ही आमची परंपरा, चिकित्सा पद्धती व आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित वारकरी भक्तीयोग उपक्रमाद्वारे पुण्याने वारीला योगाचे रिंगण दिले आहे. ते यापुढेही असेच सुरू राहो, अशा शुभेच्छाही त्यांनी शनिवारी दिल्या.

राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये जागतिक योगदिनानिमित्त आयोजित वारकरी भक्तियोग कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, पुण्याचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, मनपा आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी, प्र- कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा शीतल उगले, विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेशजी पांडे, प्रभारी कुलसचिव सीएमए डॉ. चारुशीला गायके, अधिष्ठाता प्रा. डॉ. संजय तांबट, सुप्रिया पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर देसाई, सदानंद मोरे महाराज, गहिनीनाथ महाराज, आळंदी संस्थानचे भावार्थ देखणे, स्वामी व्यागानंद महाराज,आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार भिमराव तापकीर, आमदार सुनिल कांबळे, आमदार हेमंत रासने, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य आदी मान्यवरांनी, वारकऱ्यांनी तसेच विध्यार्थ्यानी या कार्यक्रमात योगासने केली. योग प्रशिक्षक डॉ. पल्लवी कव्हाणे, अनुराधा एडके यांनी या वेळी योगासनांविषयी मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, योगसाधनेचे हे ज्ञान जगाने स्वीकारावे, यासाठी पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्र संघामध्ये प्रस्ताव ठेवला होता. त्याला प्रतिसाद देत सर्व राष्ट्रांच्या पाठिंब्याने हा जागतिक योग दिन गेली ११ वर्षे सुरू आहे. योग ही प्रत्येक व्यक्तीला करता येईल अशी साधना आहे. त्यातून शरीराला आणि मनाला योग्य दिशा मिळते. शरीरासोबत मनालाही पुनरज्जिवित करण्याचे काम योगासनांच्या माध्यमातून होते. योगदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘वन अर्थ, वन हेल्थ’चा संदेश वारकरी संप्रदाय आपल्या कृतीतून पाळतो. अशा वारकऱ्यांच्या समवेत वारीदरम्यान योगासने करण्याची ‘भक्तीयोग’ ही संकल्पना आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्याचे नेतृत्व केले आहे. त्यामुळेच पुण्यात यंदा वारकऱ्यांच्या दिंड्या आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि विद्यार्थी कॉलेजांमधून योगासने करतायेत ही आनंददायी बाब ठरते.

भारताच्या योग, ध्यान, यज्ञ अशा प्राचीन विषयांच महत्त्व होतं ते पुन्हा एकदा जगाला लक्षात आलं, त्यातलं विज्ञान लक्षात आलं आणि ते विज्ञान लक्षात आल्यानंतर सगळे जग आता त्याला फॉलो करीत असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेशजी पांडे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्राचार्य संजय चाकणे आणि रासेयो चे संचालक प्रा. डॉ. सदानंद भोसले यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या प्रशासकीय व शैक्षणिक विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. डॉ. भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.

मुख्यमंत्र्यांनी केले विद्यापीठाचे अभिनंदन!

यंदा जागतिक पातळीवरील क्यूएस वर्ल्ड रँकिंगमधे विद्यापीठ जगात ५६६ व्या स्थानी आले आहे. त्या विषयी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यापीठाच्या सर्व पदाधिकारी, प्राध्यापक व सर्व सहभागी घटकांचे अभिनंदन केले. जगभरातील पहिल्या पाचशे विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यापीठांचा नंबर येण्याचे आपले उद्दिष्ट असून, त्या दिशेने आपली यशस्वी वाटचाल सुरू असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांवरील भरतीप्रक्रिया लवकरंच सुरू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

See also  कंत्राटी प्राध्यापकांना नियमित प्राध्यापकांइतकेच वेतन देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Related posts: